बोफोर्समधील विन चड्डाचा फ्लॅट आयकर विभागाने लिलावाने विकला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/income.jpg)
मुंबई – बोफोर्स तोफ दलाली प्रकरणातील विन चड्डा याचा मुंबईतील उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलवरील सिल्व्हर ओक इस्टेटमधील पलासीमा इमारतीतील आलिशान फ्लॅट आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिलावाने विकला. विन चड्डाचा मुलगा हर्ष चड्डा याच्याकडून २२४ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी आयकर विभागाच्या वसुली अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
संरक्षण विभागातील बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणातील कथित मध्यस्थ दलाल म्हणून विन चड्डा प्रकाश झोतात आला होता. त्याचा आता मृत्यू झाला असला तरी त्याचा कायदेशीर वारस हर्ष चड्डा याच्यामुळे तो आज पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. हर्षकडे असलेल्या कर थकबाकी आणि त्यावरील व्याजाच्या २२४ कोटींच्या वसुलीबाबत आयकर विभागाने सप्टेंबर २०१९मध्ये नोटीस पाठवली होती. त्यात हा फ्लॅट विकून वसुली केली जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आयकर विभागाच्या कर वसुली अधिकाऱ्यांनी भुलाभाई देसाई रोडवरील या फ्लॅटची लिलावाने विक्री केली आहे. त्याच्या विक्रीची नोंदणी त्यांनी १७ ऑगस्टला केली आहे. बोफोर्स तोफ दलाली प्रकरणी १९९० मध्ये सीबीआयने विन चड्डाविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर २००१मध्ये ७७व्या वर्षी विन चड्डाचा मृत्यू झाला होता.