‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? : बाळासाहेब थोरात
![Ministry of Co-operation was set up, but the intention of the Central Government is still unclear](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Balasaheb-Thorat.jpg)
मुंबई | उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हाथरसच्या घटनेवर मूग गिळून गप्प का? असा थेट सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपच्या योगी सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, भाजपशासीत राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार आहे. आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होणार आहोत असे थोरात म्हणाले.