पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनाने मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/WhatsApp-Image-2020-07-31-at-8.59.18-AM.jpeg)
ठाणे – कोरोनाच्या संकटात खाकी वर्दीतील कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. मात्र कर्तव्य बजावत असताना अनेकजण या महामारीमुळे शहीद झाले आहेत. असेच पोलीस दलातील दोन जुळे भाऊही कोरोनाच्या लढ्यात शहीद झाल्याची घटना समोर आली आहे.
दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके अशी पोलीस असलेल्या या जुळ्या भावांची नावे आहेत. दिलीप आणि जयसिंग हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. यापैकी दिलीप हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात, तर जयसिंग हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.
८ दिवसांपूर्वी म्हणजेच २० जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर २८ जुलै रोजी जयसिंग यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला. अवघ्या ८ दिवसांच्या फरकाने या दोघांचाही कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ पोलीस ठाणे आणि हिललाईन पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.