निवडणूक काळात तीन दिवस ‘ड्राय डे’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/DRY-DAY.jpg)
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून ते मतदानाची वेळ संपेपर्यंत, तसेच मतमोजणीच्या दिवशी देशी-विदेशी दारू अथवा ताडीसारखे मद्यसदृश पदार्थ यांची विक्री करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
१९५१च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १३५ (सी) नुसार ही मनाई करण्यात आली असून, संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ते दिवस ‘ड्राय डे’ म्हणजेच ‘कोरडा दिवस’ म्हणून जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.
विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघांमध्ये एकूण ४ टप्प्यांत मतदान प्रक्रिया होणार आहे.
११ एप्रिल २०१९ रोजी ७ मतदारसंघांसाठी, १८ एप्रिल रोजी १० मतदारसंघांसाठी, २३ एप्रिल रोजी १४ मतदारसंघांसाठी आणि २९ एप्रिल रोजी १७ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार आहे.