नियतीनेच देवेंद्र फडणवीसांना घरी बसवले- जितेंद्र आव्हाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/jitendra-aawhad-Frame-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रडत बसले आहेत. ते म्हणताहेत की, वर्गात पहिला आलो तरी मला वर्गाच्या बाहेर बसवले आहे. पण नियतीनेच फडणवीसांना घरी बसवले आहे, अशी जोरदार टीका कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. डहाणू तालुक्यातील कासा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. त्यावेळी वाडा येथील आमदार सुनील भुसारा, माजी खासदार शंकर नम, जिजाऊ संघटनेचे प्रमुख नीलेश सांबरे, राष्ट्रवादी डहाणू अध्यक्ष राजेश पारेख, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, कॉ. बारक्या मंगात, रफिक घांची, काशीनाथ चौधरी व या भागातील उमेदवार उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, भाजपवाले जातीधर्माचे राजकारण करतात. रहिवासी पुरावे मागत आहेत. हा देश आमचा आहे. यांना ६१ सालचे पुरावे कुठून आणणार? या ग्रामीण भागात इंटरनेट सेवा नाहीये. मोखाडा, जव्हारमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामुळे पाच वर्षे आम्हाला सत्ता द्या. जिल्हा परिषदेत चांगली कामे करून दाखवतो व ही प्रचाराची सभा नाही तर विश्वासाची सभा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कासा भागात येऊन प्रचार करून गेले होते.