नवी मुंबईत मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Screenshot-46.png)
मुंबई : नवी मुंबईत वाशी सेक्टर १७ मधील MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. विद्युत बिलाबाबत लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. जर नागरिकांना दिलासा न मिळाल्यास मनसे गप्प बसणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला होता. त्यानंतर नागपूर येथे आंदोलन करण्यात आले होते. आता नवी मुंबईत खळ्ळखट्याक करण्यात आले.
MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेचे संदीप गलुगडे, अमाेल इंगाेले, शरद दिघे, आकाश पाेतेकर या मनसे कार्यकर्त्यांना अटक वाशी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, राज्यात महावितरण कंपनीकडून भरमसाठी विद्युत बिले दिल्याने तीव्र नाराजी आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे उद्योगधंदे, कार्यालये बंद होती. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नव्हते. तीन महिने विद्युत बील घेऊ नये, अशी मागणी होत होती. त्याचवेळी सरासरी बिले पाठविताना ती अव्वाच्यासव्वा पाठविले गेली. याबाबत मनसेकडून इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर आज वाशी येथील महावितरणच्या कार्यालयावर मनसेने धडक दिली.
अनेक दिवस होऊनही वीजबिलाबाबत काहीही तोडगा काढण्यात आलेला नाही. नागरिकांची संतापात भर पडत आहे. आज वाशी येथे मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले. नागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे वीज बिलावरुन मनसे अधिक आक्रमक होताना दिसत आहे.