धार्मिक स्थळंच नाही, बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांमुळेही कोरोनाचा प्रसार – महापौर
![Mumbai will be unlocked in the third phase, the mayor clarified](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/mumbai-mayor-kishori-pednekar-1590484505.jpg)
मुंबई – ‘केवळ धार्मिक स्थळंच नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांमुळेही कोरोनाचा प्रसार होतो’, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगितले. तसेच मुंबईकरांना सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘कोव्हिडचा आकडा फुगत आहे. मात्र कोरोनाबाबत जनता गंभीर नाही. कोव्हिडचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावं. केवळ धार्मिक स्थळांमुळे कोरोना पसरतो असं मी म्हटलं नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या व्यक्तींमुळेही कोरोना पसरला’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्याचबरोबर ‘लांब पल्ल्याच्या गाड्या 15 दिवसांसाठी रद्द कराव्या, याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा’, असेही पेडणेकर यांनी यावेळी सुचवले.
तसेच ‘मुंबईचं राजकारण करण्याचा घाट दोन टक्क्याच्या लोकांनी घातला आहे, आम्ही त्यांना दाखवून देऊ आमची ताकद काय आहे’, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला टोला लगावला. त्याचबरोबर ‘लव्ह जिहाद नक्की कुठे झाला, हे आम्ही दाखवून देऊ. भाजपा पक्षाचा हा अजेंडा आहे. मुला-मुलींच्या पसंतीचा विषय आहे, भाजपा फक्त शब्दांचा खेळ करतंय’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.