दुख:द! राणीच्या बागेत बाराशिंगाच्या मादीचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Ranibaugh_.jpg)
मुंबई | महाईन्यूज
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात बाराशिंगाच्या मादीचा नुकताच मृत्यू झाला. या मादीचे शवविच्छेदन केले असता तिच्या छातीवर मार बसल्याचे व्रण दिसून आले असून हृदयक्रिया बंद पडल्याने या मादीचा मृत्यू झाल्याचेही शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. भायखळ्यातील राणीच्या बागेत सध्या नवनवीन प्राण्यांच्या जोडय़ांचे आगमन होत आहे. त्यामुळे प्राण्यांचे सर्व पिंजरे अनेक वर्षांनी गजबजू लागले आहेत. मात्र शुक्रवारी रात्री बाराशिंगाच्या जोडीतील मादीचा अचानक मृत्यू झालेला आहे.
प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बाराशिंगाचा गेल्या काही दिवसांपासून ‘प्री-मेटिंग’चा काळ सुरू होता. यादरम्यान रात्री या तीन वर्षीय मादीचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे याहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना मादी निपचित पडलेली आढळली. या मादीचे शवविच्छेदन केले असता तिच्या छातीवर मार बसल्याचे व्रण दिसून आले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नर हा मादीपेक्षा वजनाने जास्त असल्यामुळे प्रणयक्रीडेच्या वेळी आक्रमक झालेल्या नराच्या हल्ल्यामुळे ही मादी जखमी होऊन मृत्युमुखी पडली असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.