तुमच्या कुंडल्या हातात येणार नाहीत याची काळजी घ्या
![BJP's Atul Bhatkhalkar also received a threatening phone call](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/atul_bhatkhalkar.jpg)
अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई | प्रतिनिधी
सरकार पडण्याचा मुहूर्त पाहणारे आता सरकारचा अहवाल वाचू लागले असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्याला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाचन सुरू केले तर पोटात मुरडा येईल, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
“महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही. असे अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार? असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.