‘तुमचे फोन टॅप होत आहेत’, भाजप ज्येष्ठ मंत्र्यानं मला माहिती दिल्याचा संजय राऊतांचा दावा
मुंबई |महाईन्यूज|
तुमचे फोन टॅप होत आहेत अशी माहिती मला भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती, असा दावा करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. आता हा भाजपचा ज्येष्ठ मंत्री कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता. त्यावर बोलताना राऊत यांनी हा दावा केला आहे.
तुमचे फोन टॅप होत आहेत. यासंदर्भातील माहिती मला भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. त्यावेळी माझं बोलणं कुणाला ऐकायचं असेल तर, त्याचं स्वागतच करतो. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपूनछपून करत नाही. माझं बोलणं ऐकाच, असं मी म्हणालो होते, असा दावा संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केला आहे. संजय राऊत यांनी हा दावा केल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फोन टॅप होत असल्याची माहिती राऊत यांना देणारा भाजपचा तो ज्येष्ठ मंत्री कोण?’, अशी कुजबुज सध्या सुरू आहे.