डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राजगृह’च्या तोडफोड प्रकरणी एका आरोपीस अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-19.jpg)
मुंबईच्या दादर येथील हिंदू कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’ची, अज्ञातांनी तोडफोड केल्याचा प्रकार 7 जुलैला घडला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये अनेकांनी या घटनेचा निषेध करत आरोपींना पकडून त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणीही केली जात होती. पोलिसांनी ही सखोल चैकशी करत या प्रकरणाच्या तपासाला सुरवात केली होती.अखेर या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. उमेश सीताराम जाधव अस या आरोपीचं नाव असून, माटुंगा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
घडल्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपवण्यात आले होते. त्यामधील चेहऱ्याशी साधर्म्य असल्यामुळे या संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.त्याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. आता पोलीस दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत. उमेश जाधव हा प्रेस भागात राहणारा 35 वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे.
7 जुलै रोजी संध्याकाळी दोन इसमांनी ‘राजगृह’ येथे तोडफोड केली. यामध्ये घरा सभोवतालच्या कुंड्या व झाडांची नासधूस झाली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. यासह घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचीही तोडफोड केली आहे. घडलेला प्रकार अतिशय निषेधार्त आहे असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले होते. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घडलेल्या गोष्टीचा निषेध केला असून, दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल असे सांगितले आहे. तसेच ‘राजगृह’ ची तोडफोड करणाऱ्या दोषींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.