टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/uddhav-thackeray-devendra-fadnav.jpg)
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी राज्य गहाण ठेवू या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. स्मारकांसाठी पैसे नाहीत, राज्य गहाण ठेवू म्हणणारे तुम्ही कोण असा सवाल उपस्थित करत राज्याचा सातबारा या महापुरूषांच्या नावावर आहे. मुख्यमंत्री येतात व जातात. पण राज्य कायम राहते. त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा ‘अतिउत्साही’ वक्तव्यांमुळे सरकारची, राज्याची ‘इभ्रत गहाण’ ठेवण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्री महोदय, टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, अशा शब्दांत इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून ठाकरे यांनी भाजपावर आगपाखड केली आहे. . फडणवीस उत्साहाने बोलले. डॉ. आंबेडकर आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर काठीच उगारली असती. फडणवीसांचे हे वक्तव्य म्हणजे राज्य आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आले आहे व कर्ज काढून सण-उत्सव साजरे केले जात असल्याचा टोलाही लगावला.
काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी..
* वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करताच राज्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असला तरी घोषणांचा पाऊस पडतो आहे. या परिस्थितीतून मार्ग काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारक व इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करायचे आहे. पैशांअभावी ही स्मारके रखडणार असतील तर ते राज्याला शोभादायक नाही.
* डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी बुलेट ट्रेनचे महागडे प्रकल्प रद्द करू, समृद्धी महामार्गावरील उधळपट्टी थांबवू, असे सांगितले असते तर ते व्यवहारी ठरले असते, पण बुलेट ट्रेन हे मोदींचे स्वप्न आहे. समृद्धी महामार्ग हे फडणवीसांचे स्वप्न आहे. या स्वप्नांना मूर्तस्वरूप देण्यासाठी पैसे आहेत, पण डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी हे लोक राज्य गहाण ठेवायला निघाले आहेत.
* पंतप्रधान मोदी इंदू मिलमध्ये आले तेव्हा या स्मारकासाठी पैसा कमी पडणार नाही असे म्हणाले होते. म्हणजे महाराष्ट्र राज्य गहाण ठेवून तुम्ही हा पैसा कमी पडू देणार नव्हता, असा याचा अर्थ आता जनतेने घ्यायचा का?
* प्रत्येक निवडणुकीत भाजप विजांचा कडकडाट व्हावा तसा पैशांचा पाऊस पाडत असतो. म्हणजे सत्ता मिळवायला पैसे आहेत, पण आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा होते. सरकारी जाहिरातींवर हजारो कोटी फेकले जात आहेत. तेथे कात्री लावा.
* गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा नर्मदा नदीच्या पात्रात उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पुतळ्याची उंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित पुतळ्यापेक्षाही जास्त आहे. मात्र सरदार पटेल यांच्या या पुतळयासाठी तेथील भाजप सरकारने गुजरात राज्य गहाण ठेवलेले नाही.