छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा जणांना कोरोनाची लागण
मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भुजबळ स्वत: होम क्वॉरंटाइन झाले असून त्यांचे कार्यालय एक आठवडा बंद राहणार आहे.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास करोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.
दरम्यान, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सकाळी स्पष्ट झाले. ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी गुरुवारी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. कदम यांना त्यांच्या पुण्यातील घरात क्वारंटाइन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देऊन संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी कदम यांच्या कुटुंबातील आमदार मोहनराव कदम यांच्यासह चौघांना करोनाची लागण झाली होती.