Breaking-newsमुंबई
घरांच्या किमतीत सात टक्के घट!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/homeloan1-.jpg)
- ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील दावा, निश्चलनीकरणानंतर विक्रीवर भर
मुंबई – निश्चलनीकरण, रेरा आणि वस्तू व सेवा कराच्या कचाटय़ातून अजून पूर्णपणे बाहेर न पडलेल्या बांधकाम उद्योगाने त्यांच्याकडील तयार घरे विकण्यावर भर दिला आहे. घरे विकली जावीत यासाठी किमती कमी करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम होऊन गेल्या वर्षीपेक्षा अधिक घरे विकली गेली. या काळात घरांच्या किमती सात टक्क्य़ांनी कमी झाल्याचा दावा करण्याता आला आहे.
‘नाईट फ्रँक‘ या सर्वेक्षण कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ चा तिमाही अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात पहिल्यांदाच घरांच्या किमती कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. घरांच्या विक्रीमध्ये या वर्षांत गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढ झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. परवडणाऱ्या घरांपोटी अनेक विकासकांनी छोटी घरे उपलब्ध करून दिल्यामुळे घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या वर्षांत ६३ हजार ८९३ घरांची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. या वर्षांत ७४ हजार ३६३ घरांची निर्मिती झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात कमालीची वाढ झाली आहे. व्यावसायिक सदनिकांच्या निर्मितीतही चांगलीच वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कालिना, कलानगर, नरिमन पॉइंट, कफ परेड, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, महालक्ष्मी, वरळी या नियमित व्यावसायिक केंद्रांप्रमाणेच आता परेळ, लोअर परळ, दादर, प्रभादेवी तसेच ठाणे, ऐरोली, वाशी, घनसोली, रबाले, बेलापूर तसेच कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई, भांडुप, चेंबूर, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड ही देखील आता नवी व्यावसायिक केंद्रे उदयास येत असल्याचे या अहवालात नमूद आहे. परवडणाऱ्या घरांसाठी विविध योजना कार्यरत असल्यामुळे त्या माध्यमातून छोटय़ा घरांची निर्मिती व विक्री झाली असून या किमतीत सात टक्क्य़ांनी घट झाल्याचे ‘नाईट फ्रँक‘चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.