‘क्या हुआ तेरा वादा?’ उद्धव ठाकरेंच्या साडेतीन वर्ष जुन्या व्हिडीओवरुन मनसेच्या अविनाश जाधवांचा सवाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Thane-MNS-Avinash-Jadhav.jpg)
ठाणे | शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांना दिलेल्या वचनांची आठवण करुन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे महापालिकेसमोर गुरुवारी थाळीनाद आंदोलन केले. नवे धरण, सेंट्रल पार्क, मालमत्ता करात सूट अशा आश्वासनांची पूर्तता कधी करणार, ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा सवाल मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
“पाचशे स्क्वेअर फुटाहून कमी जागेत राहणाऱ्या ठाणेकरांचा मालमत्ता कर रद्द करणार, शिवसेनाप्रमुखांच्या नावे सर्वांना मोफत आरोग्य सुविधा देणार.. फ्री, फ्री, फ्री” असा साडेतीन वर्षांआधी उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.
“पाचशे फुटात राहणाऱ्या ठाणेकरांचा मालमत्ता कर रद्द झाल्यास 60 टक्के मध्यमवर्गाला दिलासा मिळेल. घनकचऱ्यात छोट्या व्यापाऱ्यांना सूट देण्याचे आश्वासन ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी देण्यात आले होते, त्याचे काय झाले? ठाणेकरांना स्वतःचं धरण, ठाण्याला वाहतूक कोंडी होते, म्हणून मुंबईला जोडणारी जलवाहतूक, अशी आश्वासने दिली होती, मात्र ती प्रत्यक्षात उतरली नाहीत” असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.
“2017 मध्ये सत्तेत येताना मोठी आश्वासनं देण्यात आली. ठाणे महापालिका निवडणुकीला साडेतीन वर्ष पूर्ण झाली, मात्र तेव्हा दिलेल्या वचनांचं काय झालं?” असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. 2012 चा पंचनामा पुढच्या आठवड्यात करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.