कोरोना रोखण्यासाठी आता फिलिपाइन्समध्येही धारावी पॅटर्न राबवण्यात येणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/philippines-crime.jpg)
कोरोना रोखण्यासाठी आता फिलिपाइन्समध्येही धारावी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. फिलिपाइन्सच्या झोपडपट्ट्यांमध्ये हा पॅटर्न राबवता यावा म्हणून मुंबई महापालिकेने फिलिपाइन्स सरकारला धारावी पॅटर्नची ब्ल्यू प्रिंटच दिली आहे.
कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या धारावी पॅटर्नची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेली असतानाच आता हा ‘धारावी पॅटर्न’ फिलिपाइन्समध्ये राबवला जाणार आहे. फिलिपाइन्सच्या झोपडपट्ट्यांमध्ये धारावीच्या धर्तीवर कोरोनावर नियंत्रण आणण्यात येणार आहे. फिलिपाइन्समध्ये अनेक झोपडपट्ट्या असून लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा मोठा संसर्ग झाला असून करोना रोखणं फिलिपाइन्स सरकारच्या आता अवाक्याबाहेर गेलं आहे. त्यामुळे फिलिपाइन्स सरकारने मुंबई महापालिकेशी संपर्क साधला असून धारावी पॅटर्नची पालिकेकडून माहिती घेतली आहे.
पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी चेस द व्हायरस हे आमचं मुख्य उद्दिष्टं राहिलं आहे. योग्य वेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किंवा करोना रोखण्यासाठी चेस द व्हायरसचा प्रभावीपणे उपयोग झाला आहे. हीच पॉलिसी फिलिपाइन्स सरकारलाही लागू करायची आहे. आम्ही त्यांना धारावीच्या या पॅटर्नची ब्ल्यूप्रिंट दिली आहे, असं आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.
धारावी पॅटर्न अत्यंत साधा आहे. सर्वात आधी संशयित रुग्णाची आरोग्य तपासणी करा, कोरोनाचा संशय वाटला तर त्याची टेस्ट करा, त्यातून कोरोनाची लागण झाल्याचं कळताच रुग्णाला क्वॉरंटाइन करा, हे धोरण अवलंबलं आणि धारावीकरांनीही हा पॅटर्न स्वीकारला. त्यामुळे धारावीतील कोरोना संसर्ग रोखण्यात आम्हाला यश आलं, असंही चहल यांनी सांगितलं आहे.
करोना रोखण्यासाठी धारावी पॅटर्न अत्यंत चांगला आणि परिणामकारक आहे. आमच्या येथील दाटीवाटीच्या परिसरात हा पॅटर्न प्रभावीपणे राबवता येऊ शकतो, असं फिलिपाइन्सच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटल्याचं फिलिपाइन्सच्या ‘इनक्वायरर’ या संकेतस्थळाने म्हटलं आहे.