एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा
![Radha of Mansainiks in Eknath Shinde's program](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/vasai-Eknath-Shinde.jpg)
वसई – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वसईतील कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या’, अशा घोषणा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर वसई पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे वसईत आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. एकनाथ शिंदेंकडे ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा आहे.
वाचा :-नवी मुंबईतील माजी नगरसेवक आणि भाजपा नगरसेविका राष्ट्रवादीत
दरम्यान, वसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरुन बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे राजकारण सुरु झाले आहे. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच महापालिका हद्दीत बविआने उद्घाटन करुन सेवा सुरू केली. परंतु आता हीच परिवहन सेवा आम्ही सुरु केली असल्याचा दावा करत या परिवहन सेवेचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने आज आयोजित करण्यात आला. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र यावेळी मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा केला. मग पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना बेदम चोप देत कार्यक्रमातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.