उद्धव ठाकरेंनाही पावसाचा फटका, ‘मातोश्री’बाहेर साचलं पाणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई तसंच उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बसला आहे. उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलनागर परिसरात पाणी साचलं आहे. महापालिकेचा कारभार शिवसेनेकडे असून शिवसेना प्रमुखांनाच पावसाचा फटका बसला असून मातोश्रीचा परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. वांद्रे येथील कलानगर, सरकारी वसाहत, शास्त्री वसाहत आणि एमआयजी ग्राऊंड परिसरात पाणी साचलं आहे.
विशेष म्हणजे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी बोलताना मुंबई कुठेही तुंबली नसल्याचा दावा केला होता. पण सलग दोन दिवस सुरु असलेल्या पावासामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी मातोश्रीजवळील नाल्याची सफाई न झाल्यामुळे मुख्य अभियंत्यांसोबत बाचाबाची झाली होती. यानंतर उद्धव ठाकरेंनीच महापौरांना नाल्याची साफसफाई न झाल्याचं लक्षात आणून दिलं होतं.