उच्च न्यायालयाचे ‘ईडी’ला आदेश; चोक्सीला तूर्त फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करू नका
मुंबई | महाईन्यूज
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अर्जावर चार आठवडय़ांत अंतिम निर्णय घेऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला दिले आहेत. ईडीने केलेल्या अर्जाविरोधात चोक्सी याने उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाला आदेश देण्यास मज्जाव करण्याची मागणी केलेली आहे.
न्यायमूर्ती अनंत बदर यांनी चोक्सी याच्या याचिकेवर सुनावणी घेताना ईडीच्या अर्जावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यावर चार आठवडे अंतिम निर्णय देऊ नये, असे आदेश विशेष न्यायालयाला दिलेले आहेत. गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर चोक्सी देश सोडून पळून गेलेला होता, तसेच आजारपणाचे कारण सांगत त्याने भारतात येण्यास नकार दिलेला होता, त्यामुळे ईडीने त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केलेला आहे.