आयपीएलमध्ये घुमला ‘चौकीदार चोर है’चा नारा!
मुंबई – आयपीएलचा संग्राम सुरू झाला आहे. जयपूरमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ विरुद्ध ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’चा सामना नुकताच रंगला. हा सामना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. क्रिकेट संघाला प्रोत्साहीत करण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित नेहमी ‘जितेगा भाई जितेगा…’च्या घोषणा देतात. पण या सामन्यात चक्क ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस लगावत असलेल्या ‘चौकीदार चोर है’चा नारा आयपीएलमध्ये ऐकायला मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब फलंदाजी करत असताना १४व्या षटकात पहिल्यांदा स्टेडियममध्ये स्पीकरवरून ‘जीतेगा भाई जीतेगा!’, अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थितांनी ‘राजस्थान जीतेगा’, असा प्रतिसाद दिला.
सामन्याच्या १८व्या षटकातील पहिला चेंडू जयदेव उनाडकटने टाकला तेव्हा नॉर्थ स्टँडमधून मोदी-मोदी, अशा घोषणा सुरु झाल्या. या षटकामध्ये निकोलस पूरनने जेव्हा चौकार लगावला तेव्हा ‘चौकीदार चोर है’, ही घोषणा देण्यात आली. त्यानंतर लागोपाठ ‘चौकीदार चोर है’चा नारा स्टेडिअममध्ये ऐकायला मिळत होता.