आग लागली की लावली?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Unt.jpg)
- आरे वसाहतीतील रहिवाशांचा सवाल; १५ वर्षांपासून त्रास असल्याची तक्रार
आरे कॉलनी परिसरातील वनराईत गेल्या १५ वर्षांपासून अधूनमधून छोटी-मोठी आग लागत आहे. त्यामुळे पसरणारा धूर आणि उडणारी राख यामुळे या परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात माजणारे गवत सुकल्यानंतर आग लागत असून ही आग लावली जाते की लागते, अशी शंकाही रहिवासी उपस्थित करीत आहेत. ‘ना विकास क्षेत्र’ विकासासाठी ही जमीन खुली करण्यात येणार असल्यामुळे या परिसरावर अनेकांचा डोळा असून त्यातूनच हे प्रकार केले जात असल्याचा आरोपही या रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीजवळील नागरी निवारा परिषद परिसराच्या मागील डोंगराळ भागात सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. सुके गवत आणि पालापाचोळ्यामुळे आग पसरत गेली आणि आरे कॉलनीमधील आदिवासी पाडे आणि आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाचे जवान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अग्निसुरक्षा पथक आणि स्थानिक रहिवाशांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या डोंगरावर अधूनमधून छोटी-मोठी आग लागतच आहे. दरवर्षी किमान एकदा तरी आग लागते. आग लागल्यानंतर प्रचंड धुरामुळे त्रास सहन करावा लागतो. आग विझल्यानंतर उडणारी राख रहिवाशांची डोकेदुखी बनते. वाऱ्याबरोबर राख घरात येऊ नये म्हणून खिडक्या बंद ठेवाव्या लागतात, अशी खंत नागरी निवारामधील रहिवासी संदीप सावंत यांनी व्यक्त केली. गेली १५ वर्षे सातत्याने या परिसरातील वृक्षवल्लींमध्ये आग लागत आहे. हे संशयास्पद आहे. मुळात हा परिसर ‘ना विकास क्षेत्रा’त मोडतो. मात्र वृक्षवल्लीने नटलेल्या या परिसरावर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे कदाचित या भागात आग लावण्यात येत असावी, अशी कुजबुज या परिसरात सुरू असते. मात्र शासकीय यंत्रणा त्याकडे लक्ष देत नाही, असा आरोप संदीप सावंत यांनी केला.
आगीच्या चौकशीची मागणी
आरे कॉलनीत सोमवारी लागलेल्या भीषण आगीप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करीत मनसेने मंगळवारी निषेध मोर्चा काढला. या आगीत ४ किलोमीटरचे जंगल नष्ट झाले होते. आगीबद्दल विविध स्तरांतून संशय व्यक्त होत आहे. या वेळी मनसे नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली. आग लागल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. तसेच या घटनेची निष्पक्षपातीपणे न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. या प्रकरणी मनसे हरित लवादाकडेही दाद मागणार आहे.