अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एन्ट्री; रिपाइंत प्रवेश
मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोष ने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पायलने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थिती पायलचा पक्षप्रवेश झाला. पायलसोबतच तिचे वकीलही रिपाइंमध्ये प्रवेश करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री पायल घोषकडे रिपाईच्या महिला मोर्चाचं उपाध्यक्ष पद सोपावलं जाऊ शकतं.
पायलच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘कायद्यानुसार पायलवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही पायल घोषसोबत आहोत. याप्रकरणी मला पश्चिम बंगालमधूनही फोन आले होते. पायल पश्चिम बंगालची आहे. तुम्ही मुंबईत राहता. तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, असं मला सांगण्यात आलं. मी सांगितलं त्यांना की, मला हे सगळं सांगण्याची गरज नाही. मला सगळं माहिती आहे. त्यामुळे या अभिनेत्रीला पाठिंबा देण्याची आमची जबाबदारी होती. त्यामुळेच आम्ही पायल घोषला पाठिंबा दिला. तसेच अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक करण्यात यावी हिच आमची मागणी आहे.’
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘यादरम्यान जेव्हा पायलशी आमची चर्चा झाली तेव्हा आम्ही रिपाइं नेहमीच अन्याय होणाऱ्यांसाठी आवाज उठवणारा पक्ष आहे, असं सांगितलं. तसेच जर तुम्ही आरपीआयमध्ये आलात तर आमच्या पक्षाला एक चांगला चेहरा मिळेल. त्यानंतर पायलनेही पक्षप्रवेश करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आज त्यांचा पक्षप्रवेश केला जात आहे.’