breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अडीच वर्षांनंतर पत्रिपूलाचे काम पूर्ण, सोमवारी होणार उद्घाटन

कल्याण – जवळपास अडीच वर्षांनंतर कल्याणच्या पत्रिपुलाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी २५ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्धाटन करण्यात येणार आहे. नियोजनानुसार शुक्रवारी ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना देताच अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. यामुळे अखेर वाहतूककोंडीतून सुटका होण्याचा मुहूर्त निश्चित झाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

ब्रिटिशकालीन पत्रीपुलावर १८ नोव्हेबर २०१८ला रेल्वेकडून हातोडा मारण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून ३६ कोटी रुपयांच्या निधीतून नवा ११० मीटर लांबीचा पत्रीपूल तयार करण्यात आला असून कमीत कमी वेळेत हा पूल पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांतून ठेकेदारावर दबाव येत असल्याने दिवसरात्र काम करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, सुरुवातीला रेल्वेकडून पुलाची लांबी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेली दिरंगाई, लॉकडाउनमुळे ठप्प असलेली वाहतूकसुविधा यामुळे पहिल्या लॉकडाउनचा तीन महिन्यांचा कालावधी वाया गेला. मे महिन्यापासून पुन्हा एकदा शासनाच्या परवानगीने पुलाचे काम सुरू करण्यात आले.

नोव्हेंबर महिन्यात पुलाचा ७६ मीटर लांबीचा रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा एकसंध गर्डर बसविण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाने वेग घेतला होता. मात्र तेव्हाच अधिकाऱ्यांनी उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर ठेकेदाराने ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करत २२ जानेवारी रोजी पूल रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला असून वाहनचालकांना पत्रीपुलावरील वाहतूक कोंडी आणखी दोन दिवस सोसावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button