निर्बंध शिथिल होणार की कायम राहणार? आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/uddhav-thackeray-1.jpeg)
मुंबई – आज दुपारी साडेतीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत १ जूननंतर राज्यात कडक निर्बंध कायम ठेवण्याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहा:कार रोखण्यासाठी महाराष्ट्रात १ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अनेक ठिकाणची रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे, मात्र अजूनही काही ठिकाणी रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे आता १ जूननंतर कडक निर्बंध संपूर्ण उठणार की शिथिल होणार किंवा निर्बंध अधिक कठोर होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, ‘तौक्ते’ चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अलिकडेच कोकण दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते, ‘कोरोना कमी होतोय हे नक्कीच पण गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे, गेल्या वेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला. सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे, हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथिल केल्यानंतर मागील अनुभवातून आपल्याला शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील’, असे त्यांनी म्हटले होते. तर 24 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल’, असे सांगितले होते.