हिम्मत असेल तर राजीनामा द्या अन् निवडणूक लढवून दाखवा; विजय शिवतारेंचा संजय राऊतांना इशारा
![Vijay Shivtare said that if you have courage, resign and contest elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/sanjay-raut-and-vijay-shivtare-780x470.jpg)
संजय राऊत म्हणजे आयजीच्या जावावर बायजीचा उद्धार आहे
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांवर सर्व चोर लफंगे शिंदे गटात गेले आहेत. हा कचरा होता. पानगळा होती. ती शिंदे गटात गेलीय, अशी टिका केली होती. याला आता शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला कचरा म्हणता? हिंमत असेल तर 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या, अशी टिका केली आहे.
शिवसेनेचे 40 आमदार, खासदार हे कचरा आहेत. झाडाची पानगळ आहेत असं चुकीचं विधान संजय राऊतांनी केलं. राऊत आपला जन्मच या कचऱ्यातून झाला आहे. याला कचरा म्हणत असाल तर तुम्हाला आम्ही कचरा वाटत असेल, तुमच्यात हिंमत असेल तर उद्याच्या उद्या खासदारकीचा आधी राजीनामा द्या आणि राज्यातून कोणत्याही भागातून निवडून येऊन दाखवा. तुम्हाला तुमची लायकी कळेल, अशी टिका विजय शिवतारेंनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
याच आमदार आणि खासदार यांच्या मतावर तुम्ही राज्यसभेत पोहोचला आहात. मीही तुम्हाला दोनदा मतदान केलं आहे. मलाही तुम्हाला तेवढं बोलण्याचा अधिकार आहे. एवढाच कचरा वाटत असेल तर राजीनामा द्या. हिंमत असेल तर 12 तासाच्या आत स्वाभिमानाने खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असं आव्हान संजय राऊतांना दिला आहे.
उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला करू नका, जरा निवडणुकीला उभे राहा. म्हणजे तुम्हाला तुमची लायकी कळेल. बाष्कळ बडबड करू नका. तुमचा चेहरा पाहण्याचाही जनतेला वीट आलाय. संजय राऊत म्हणजे आयजीच्या जावावर बायजीचा उद्धार आहे, अशी खोचक टिका केली आहे.