हातात बंदूक, पूजा खेडकरांच्या आईचा शेतकऱ्यांना धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल
![Video of Pooja Khedkar's mother threatening farmers goes viral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Pooja-Khedkar-780x470.jpg)
पुणे | आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांनी आयएएससाठी दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. असं करुन त्यांनी काही सवलती मिळवल्या. त्यावरुन वाद सुरु झाला. या सर्व प्रकरणाची आता थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. केंद्राने या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. आता पूजा खेडकर यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पूजा खेडकर यांच्या आई बंदूक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओमधील महिला IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर असल्याचंच सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये त्या एका गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा – पत्रकारांसाठी ‘वेल्फेअर बोर्ड’ : ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांच्या लढ्याला यश!
हा व्हिडीओ मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांना धमकावत आहे. त्यांच्या बाजूला त्यांचे अंगरक्षकही दिसत आहेत. काही शेतकरी, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही असं करू शकत नाहीत, असं सांगताना ऐकू येत आहेत. पण त्याचवेळी, मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असं त्या गावकऱ्यांना सांगत आहेत.
धडवली गावात खेडकर कुटुंबाने २५ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला होता, असं सांगितलं जात आहे. या वादावेळी त्या गावात बाऊन्सर घेऊन गेल्या व त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावल्याचंही बोललं जात आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही तक्रार मात्र नोंदवली गेली नसल्याचं सांगितलं जात आहे.