अतिशय धक्कादायक! जन्मदात्याचा मुलीवर अत्याचार; गुप्तधनासाठी नरबळीचाही प्रयत्न
![Very shocking! Oppression of the birth mother daughter; Attempts at human sacrifice for secret money](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Very-shocking.jpg)
यवतमाळ | जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीवर वारंवार अत्याचार करून गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना बाभूळगाव तालुक्यात २५ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. पोलीस घटनास्थळावर वेळीच पोहोचल्याने नरबळीचा डाव उधळला गेला. या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले असून, या घटनेचा सर्व स्तरावरून संताप व्यक्त होत आहे.
राळेगावचे रहिवाशी असलेले वाल्मिक रमेश वानखेडे (३३), विनोद नारायण चुनारकर (४२), दीपक मनोहर श्रीरामे (३१), आकाश शत्रूघन धनकसार (३४), माधुरी विजय ठाकूर (३०), माया प्रकाश संगमनेरकर (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
बाभूळगाव तालुक्यातील तरुणी यवतमाळात काकाकडे शिक्षणासाठी राहण्याकरिता गेली होती. दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे काकाकडे राहूनच पूर्ण केले. अकरावी व बारावीचे शिक्षण अकोला येथे केले. सध्या ही तरुणी औरंगाबाद येथे बी फार्मसीचे पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. सुट्ट्या असल्या की, तरुणी गावाकडे नेहमीच येत होती. मात्र, वडील आपल्यावर सतत शारीरिक अत्याचार करत असल्याची तरुणीचने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तरुणीने आईकडे याबाबत तक्रार केली. मात्र, वडिलांच्या धाकापुढे आई काहीही करू शकली नाही. पीडित तरुणी जेव्हा-जेव्हा सुट्टीवर घरी यायची, तेव्हा-तेव्हा वडील तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होते. तरुणीने विरोध केला असता ‘तू जर कुणाला ही बाब सांगितली तर तुला, आईला व बहिणीला जिवे मारून टाकेन’ अशी धमकी दिली. या काळात पित्याने मुलीसोबत वारंवार अत्याचार केले. त्यानंतर तरुणी काकाकडे यवतमाळला निघून आली.
पीडिच तरुणी जानेवारी २०२२ पासून औरंगाबाद येथे शिक्षणासाठी राहत आहे. १५ दिवसांपूर्वी प्रकृती ठिक नसल्यामुळे तरुणी औरंगाबाद येथून घरी आली. त्यावेळी आईची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथे भरती करण्यात आले. वडिल दवाखान्यातच राहत होते. तरुणी लहान बहिणीसह घरी होती. आठ दिवसांपूर्वी आई दवाखान्यातून घरी आली. दरम्यान दोन ते तीन दिवसांपासून तरुणीचे वडील गुप्तधनाबाबत फोनवर काही लोकांसोबत चर्चा करीत होते. घरात चिडचिड करून तरुणीसह बहिणीला मारहाण करीत होते. २४ एप्रिल रोजी रात्री कामाच्या कारणावरून तरुणीच्या वडिलांनी दोन्ही बहिणींना माराहण केली. ‘तुझ्या सारखी मुलगी जिवंत ठेऊन काहीच उपयोग नाही’, असे म्हटले. २५ एप्रिल रोजी सकाळपासून तरुणीचे वडील गुप्तधनाबाबत फोनवर बोलत होते. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता वडिलांनी तरुणीस ‘तू आंघोळ करून तयार राहा, आपल्याकडे माणसे येणार आहे’, असे बोलून मागची खोली साफ केली.
त्यानंतर रात्री ९ वाजताचे सुमारास घरी गावातील विजय बावणे (४१), शेतात काम करणारा रमेश गुडेकार (५०) व बाहेरगावातील चार पुरुष व दोन महिला आल्या. सर्वजण मागच्या खोलीत गेले. त्यावेळी आई, लहान बहीण बाजूच्या खोलीत थांबून होते. वडिलांनी दरवाजा लावायला सांगितला व तू आता बाहेर यायचे नाही, तुझे येथे काम पडणार आहे, असे म्हटले. त्यानंतर चर्चा सुरू असताना त्यांपैकी एकाने गुप्तधनासाठी एका व्यक्तीचा नरबळी आवश्यक आहे, असे म्हटल्याचे पीडित तरुणीने ऐकले आणि तिला धक्का बसला.
वडिलांनी मोठ्या मुलीचा बळी देण्यास तयार आहे, असे म्हटल्याचेही तरुणीने ऐकले. वाल्मिक बाबा अशा नावाने मांत्रिकाला वारंवार हाका मारत होते. त्यांच्या बोलण्यातून ते सर्वजण राळेगाव येथून आल्याचे तरुणीच्या लक्षात आले. वडिलांनी बहिण, आई व तरुणीच्या हातात एक-एक लिंबू दिला व परत त्या खोलीत गेले. हा संपूर्ण प्रकार तरुणी लपून बघत होती. त्यावेळी वडिलांनी गणपतीसमोर दुर्वा ठेवल्या व दुधाचा नैवद्य दाखविला. त्या दोन महिलांच्या हाताने जागेची पूजा करण्यात आली. वडिलांनी जबरदस्तीने त्या खोलीत नेले व तेथे सर्वांनी तरुणीची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार टाकला. त्याचवेळी पोलीस आले व त्यांनी सर्व प्रकार थांबवून तरुणीचा जीव वाचविला.
पोलिसांनी चौकशी केली असता मांत्रिकाचे नाव व अन्य नावे समोर आली. याप्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी संबंधितांविरुद्घ गुन्हा नोंद केला. यावेळी खड्डा खोदण्याचे साहित्य कुदळ, फावडे, टिकाव, टोपले, पूजेचे साहित्य, चाकू, सुरी आदी पोलिसांनी जप्त केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र जेधे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी, सागर बेलसरे, आषिश अवजाडे करीत आहेत.
‘त्या’मॅसेजने तरुणीचा जीव वाचला..
दोन महिलांनी पूजा केल्यानंतर उर्वरित लोक एक मोठा खड्डा खोदू लागले. तेव्हा भीती वाटल्याने मोबाइलमध्ये लपून गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याचा फोटो तरुणीने काढला. तसेच यवतमाळ येथील मित्र सचिन मेश्राम याला सदर फोटो पाठविला व बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव असा मॅसेज केला. त्यानंतर मोबाइल चेक होईल, या भीतीने तरुणीने फोटो व मॅसेज डिलीट केला. तरुणाने स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर एलसीबी बाभूळगावात पोहोचली. स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठण्यात आले. त्यानंतर घटनेचा उलगडा होवून मोठा अनर्थ टळला.