TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

भाज्यांचे दर आवाक्याबाहेर; परतीच्या पावसाचा परिणाम

ठाणे, पुणे, नाशिक : आठवडय़ापूर्वीपर्यंत राज्यातील विविध भागांत परतीच्या पावसाने केलेल्या तांडवामुळे भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारात भाज्यांचे दर थेट २० ते २५ टक्क्यांनी वाढले असून हीच परिस्थती नाशिक आणि पुण्यातही आहे.

राज्यातील पुणे, नाशिक जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांत झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-ठाणे आणि पुण्यात भेंडी, गवार, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडले आहेत. सध्या बाजारात उत्तम दर्जाच्या भाज्या केवळ २५ टक्केच येत असल्याची माहिती समोर आली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ४०० ते ४५० भाज्यांच्या गाडय़ा दाखल होत आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली. किरकोळ बाजारात गवार १२० रुपये प्रति किलोने तर, वाटाणा २५० रुपये प्रति किलोने विक्री केले जात आहे. तसेच नेहमी स्वस्त असणाऱ्या फ्लॉवरची विक्रीदेखील १०० रुपये प्रति किलोने करण्यात येत आहे.

सध्या भाजीपाला लगेच सडत असल्याने त्याची साठवणूक करणे अशक्य असल्याचे नाशिकमधील किरकोळ भाजीपाला विक्रेते गणेश बोरसे यांनी सांगितले. मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील अडते विलास भुजबळ यांनी दिली.

झाले काय?

भाज्यांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. परिणामी, दरात वाढ झाली आहे. बाजारात भाज्यांची आवक सुरळित होताच ही परिस्थिती निवळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

अजून शेतात पाणी.

परतीच्या पावसामुळे अजूनही सिन्नर, येवला, नाशिक तालुक्यातील अनेक शेतांमध्ये दलदलीसारखी स्थिती आहे. त्यामुळे भाजीपाला काढण्यास अडचणी येत आहेत. ही स्थिती अजून १०-१२ दिवस राहण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नोव्हेंबरपर्यंत जाच..

नव्या भाज्या तयार व्हायला आणखी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून परराज्यातल्या भाज्या बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात होतील. त्यामुळे या काळात भाज्यांचे दर कमी होऊ शकतात, असे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले.

थोडी माहिती..

मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३० ते ४० टक्के भाज्यांची आवक पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतून तसेच १० ते २० टक्के आवक सांगली, सोलापूर, सातारा अशा इतर जिल्ह्यातून होत असते. तर इतर आवक दुसऱ्या राज्यांमधून होत असते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button