कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; राजकीय सत्तेपेक्षा समाजाच्या मनावर सत्ता महत्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : राजकीय सत्ता येते आणि जाते, हे माझ्यापेक्षा कोणीच अनुभवले नाही. मात्र ज्यांची समाजाच्या मनावर सत्ता असते त्यांची सत्ता कधीच जात नाही असे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कर्मयोगी, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी एस टी महामंडळाचे अध्यक्ष असताना तोट्यातील एस टी फायद्यात आणली. परिचारकांचा एस टी महामंडळात पॅटर्न परिचित आहे असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. तर आता यापुढे साखर कारखानदारांनी ‘ग्रीन सीएनजी’ प्रकल्प उभे करावेत असेही त्यांनी आवाहन केले.
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री आणि सुधाकरपंत यांचे घनिष्ट सहकारी विजयसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राजन पाटील, आमदार समाधान आवताडे, बाबासाहेब देशमुख, उत्तम जानकर, राजू खरे, रणजितसिंह मोहिते पाटील, अभिजित पाटील, नारायण पाटील, राजाभाऊ राउत, शहाजीबापू पाटील, राम सातपुते, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘सरकार सेंद्रिय शेती प्रमाणपत्रांची पडताळणी करेल’; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
पुढे बोलताना फडणवीस यांनी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी निस्पृह सेवा केली. वास्तविक पाहता कमी कालावधीत हा कार्यक्रम ठरला. पण मोठा जनसमुदाय उपस्थित झाला. हे पंतांच्या प्रेमापोटी आहे. सत्ता येते आणि जाते. हे माझ्या पेक्षा कोणीच अनुभवले नाही. मात्र ज्यांनी समाजाच्या मनावर सत्ता कधीच जात नाही असे ते म्हणाले.
परिचारक यांनी अनेक संस्था उभ्या केल्या त्यांच्या काम आजही चांगले सुरु आहे. कारण त्यांनी पारदर्शी कारभार केला. जनतेला प्राधान्य दिले. सुधाकरपंत परिचारक, गणपतराव देशमुख यांच्या सहवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. परिचारक यांनी एस टी महामंडळ फायद्यात आणले. यामुळे महामंडळात परिचारक पॅटर्न परिचित आहे असे फडणवीस म्हणाले.
राज्यात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. पांडुरंग कारखान्याने १० हजार टन गाळप क्षमता गाठली आहे. पोटॅश प्रकल्प उभारत आहेत. आता इथेनॉल करताना निर्माण न होणाऱ्या उप उत्पादनातून ‘ग्रीन सीएनजी’ सारखे इंधन तयार करता येते. साखर उत्पादनात आतापर्यंत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या बाबी आता उत्पन्नाचे साधन ठरत आहे.त्यामुळे कारखान्याने ‘ग्रीन सीएनजी’ प्रकल्प उभा करावा असे आवाहन त्यांनी केले. प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले.