‘उद्धव साहेब, तुम्ही काळजी करायची नाही’; फायर आजींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
!['साहेब, तुम्ही काळजी करायची नाही'; फायर आजींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/साहेब-तुम्ही-काळजी-करायची-नाही-फायर-आजींनी-घेतली-मुख्यमंत्री-उद्धव.jpg)
मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षात बंड केल्यानंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. या बंडामुळे व्यथित झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आपले वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीवर निघून गेले. त्यावेळी हजारो शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शिवसेनेच्या ९२ वर्षे वय असलेल्या फायर आजी (Fire Aaji) म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रभागा शिंदे (Chandrabhaga Shinde) या देखील या परिस्थितीमुळे व्यथित झाल्या असून त्यांनी आज मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. साहेब काळजी करू नका, शिवसैनिक आपल्या बरोबर आहेत, असे फायर आजीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले.
एकाही बंडखोर आमदाराला मी नको असेन तर तसे सांगावे, मी राजीनामा देतो अशी तयारीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. साहेब तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करायची नाही. तसेच तुम्ही मुळीच राजीनामा देऊ नये, असे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे फायर आजी यांनी म्हटले आहे.
- ‘रिक्षावाला होता, आमदार झाला.. गेला तो गेला’
आम्ही आज मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. आम्ही साहेबांना बोललो की, साहेब तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही शिवसैनिक तुमच्या बरोबर आहोत, असे फायर आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाल्या. या वेळी फायर आजींनी बंड करणारे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.
- ‘एकनाथ शिंदेंनी येऊन माफी मागावी’
एकनाथ शिंदेंबाबत बोलताना फायर आजी म्हणाल्या की, एकनाथ शिंदे हे रिक्षावाले होते. त्यानंतर ते आमदार झाले. ते जर कट्टर शिवसैनिक असले तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडे येतील आणि साहेबांची माफी मागतील. साहेब त्यांच्याकडे जाणार नाहीत. जे गेले ते गेले, मग ते शिवसैनिक नाहीत, असे फायर आजी म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कदापि राजीनामा देऊ नये, असेही त्या म्हणाल्या.