“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी?”
!["There is no BJP Chief Minister in Maharashtra, why should the people of Maharashtra pay the price?"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/4fadanvis_10.jpg)
मुंबई |
महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे. अतिप्रचंड वेगाने होत असलेलं संक्रमण आणि रुग्णवाढीचा विस्फोट आणि लसीकर यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्यानंतर राज्य सरकार हळूहळू लॉकडाऊनकडे वळताना दिसतंय. मात्र, लॉकडाऊनवरून भाजपाने विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. भाजपाकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकांचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे. राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधत शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनसंदर्भात भाजपाकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकेवर सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावावेच लागेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विरोधी पक्षाला लॉकडाऊनमुळे लोकांचे अर्थचक्र बिघडेल अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे ते थांबवायचे तर कडक लॉकडाऊन आणि निर्बंध अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांचं सांगणं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित होते. फडणवीस व त्यांच्या पक्षाचे लॉकडाऊनसंदर्भात वेगळं मत आहे. लॉकडाऊन नकोच, तसे काही झाले तर लोकांचा उद्रेक होईल असे जे फडणवीस म्हणतात त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही, पण करोना संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आता त्याऐवजी दुसरा काही पर्याय असेल तर फडणवीस यांनी सांगावं. नोटाबंदी, लॉकडाऊन या विषयाची ओळख पंतप्रधान मोदी यांनी देशाला करून दिली आहे. भ्रष्टाचाराची साखळी तुटावी म्हणून नोटाबंदी व करोना संक्रमणाची साखळी तुटावी म्हणून मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा एक वर्षापूर्वी केली होती तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी त्या निर्णयाचे थाळ्या वाजवून स्वागत केलं. आज करोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठेवले तर जनतेवर उपकार होतील,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
“महाराष्ट्रात शनिवारी ५९,४११ इतक्या नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारखी ठिकाणे हॉटस्पॉट बनली. देशातला कालचा आकडा दीड लाखावर गेला. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे या संकटाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी? आणि बाजूच्या गुजरात राज्यात भाजपाचे राज्य असूनही तेथे करोना आटोक्यात आला असे नाही. उलट सुरत, अहमदाबादेत करोनाचे रुग्ण रस्त्यावर, फुटपाथवर पडेपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे या गंभीर परिस्थितीतही लॉकडाऊन लावायला तयार नाहीत. कारण व्यापारी मंडळींचे नुकसान होईल. व्यापाऱ्यांचा पक्ष फक्त व्यापाऱ्यांचाच विचार करीत असेल, तर करोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात आयसीयू, व्हेंटिलेटर, बेडचा तुटवडा सुरू आहे. सरकारी आणि खासगी इस्पितळांत फक्त ११७ बेड शिल्लक आहेत. नांदेड जिह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन झाले, शिवसेनेच्या नाशिकमधील नगरसेविका कल्पना पांडे करोनामुळे जग सोडून गेल्या. सरसंघचालक मोहनराव भागवत करोनामुळे इस्पितळात आहेत. सामान्य जनता हवालदिल आहे. व्यापार, उद्योग, शाळा, राजकारण, मंदिर, मशिदी जिथल्या तिथेच राहतील. मात्र माणूसच जिवंत राहिला नाही तर काय कराल? या जगात माणसाच्या जिवाशिवाय दुसरे काहीच मोलाचे नाही. ना ईश्वर, ना धर्म, ना पैसा, ना राजकारण! तेव्हा करोना संकटप्रश्नी कोणीही राजकीय धुळवड करू नये हेच बरे,” असं आवाहन शिवसेनेनं भाजपा नेत्यांना केलं आहे.