प्रतीक्षा संपली! पुण्यातून थेट सिंगापूर विमानसेवा सुरु; या तारखेला उडणार पहिलं विमान
![The wait is over! Direct Singapore flights from Pune start; The first flight will take off on this date](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Airoplane-720x470.png)
। पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मान्यता मिळाली आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रवाश्यांना या विमानसेवेची प्रतीक्षा होती मात्र अखेर या विमानसेवेला हिरवा कंदील मिळाला आहे. 2 डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे. मागील महिन्यात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या विमासेवेबाबतचा प्रस्ताव आहे, असं जाहीर केलं होतं. पुणे सिंगापूर विमानसेवा सुरु करणार आहोत. त्याचबरोबर बँकॉक आणि दोहा या ठिकाणी विमानसेवा सुरु करण्याबाबत देखील आम्ही विचार करतो आहोत, असंही ते म्हणाले होते.
पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. म्हणजेच आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच या सेवेचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे. पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानुसार आता पुणे सिंगापूर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी काही देशात विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे .
यामुळे आता पुणे ते सिंगापूर प्रवास 8 तासात तर सिंगापूर ते पुणे प्रवास 4 तासात पूर्ण होणार आहे. या विमानसेवेचा फायदा व्यावसायिकांना आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासाठी तिकीट दर देखील जाहीर करण्यात आले आहेत आणि दिवसातून 2 फेऱ्या असणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना सोयीनुसार प्रवास करणं शक्य होणार आहे.
किती असतील तिकीट दर?
– 17 हजार 799 रूपये (इकॉनॉमी)– 32 हजार 459 रूपये (प्रिमियम इकॉनॉमी)– 82 हजार 999 रूपये (बिझनेस क्लास)
दिवसभरात 2 फेर्या
1) पुणे-सिंगापूर – दु.2 वाजून 10 मिनिटे – रात्री 10 वाजून 30 मिनिटे2) सिंगापूर ते पुणे – स.11 वाजून 50 मिनिटे – दु.3 वाजून 15 मिनिटे