जालन्यात पुन्हा एकदा कोविड रुग्णालयाची तोडफोड; कर्मचारी जखमी
जालना – जालन्यात काही दिवसांपूर्वी एका कोविड रुग्णालयात नातेवाईकांनी धुडगूस घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा कोविड रुग्णालयात नातेवाईकांनी धुडगूस घालून राडा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील नूतन वसाहत परिसरातील नवजीवन रुग्णालयात ही घटना घडली असून यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या नातेवाईकाच्या बिलावरून रितेश चौधरी याचा रुग्णालयातील मेडिकल चालकासोबत वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रितेश चौधरी आपल्या अन्य 2 साथीदारांना घेऊन आला आणि त्याने रुग्णालयावर जोरदार दगडफेक करत तोडफोड केली. जा घटनेत एक कर्मचारी जखमी झाला असून रुग्णालयातील मेडिकलचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पोलिसांनी रितेश चौधरी याला ताब्यात घेतले असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.