‘महाईन्यूज’ चे वृत्त तंतोतंत खरे : मनसेच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; पार्थ पवारांनी केले स्वागत!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Rupali-Patil-ncp.jpeg)
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हातावर बांधले घड्याळ
– पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई । विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) यांनी बुधवारी (दि. 15) मनसे पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच गुरुवारी (दि. 16) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याबाबत ‘महाईन्यूज’ने रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त दिले होते. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या प्रवेशाने ‘महाईन्यूज’चे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधले.
दरम्यान, रुपाली पाटील शिवसेना की राष्ट्रवादीत प्रवेश करणार याबाबत चर्चा होती. मात्र, रुपाली पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अशा अशयाची बातमी ‘महाईन्यूज’ ने प्रसिद्ध केली होती. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची रुपाली पाटील ठोंबरे यांनी गुरूवारी सकाळी अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मनसेचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार, असे सांगितले जात आहे.
पार्थ पवारांनी केले स्वागत…
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. पार्थ पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘अॅड. रुपाली पाटील ठोंबरे यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत आहे. पुण्यातील तरुण आणि महिलांशी संबंधित प्रश्न हिरीरीने मांडण्यात त्या कधीच मागे हटल्या नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे की, त्या यापुढेही तितक्याच तीव्रतेने आणि सचोटीने काम करत राहतील.’
Adv. रुपाली पाटील ठोंबरे यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत आहे. पुण्यातील तरुण आणि महिलांशी संबंधित प्रश्न हिरीरीने मांडण्यात त्या कधीच मागे हटल्या नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे की त्या यापुढेही तितक्याच तीव्रतेने आणि सचोटीने काम करत राहील. #Rupali_Patil
— Parth Pawar (@parthajitpawar) December 16, 2021