म्हाडाच्या घरांचा मुहूर्त ठरला; कधी निघणार सोडत?

MHADA Lottery 2026 : मुंबई आणि उपनगरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गगनाला भिडलेल्या खासगी घरांच्या किमतींमुळे हताश झालेल्या नागरिकांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने नव्या वर्षात तब्बल २००० हून अधिक घरांच्या सोडतीची तयारी केली असून, या लॉटरीची अधिकृत जाहिरात फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाने घरांच्या सोडतीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, येत्या फेब्रुवारी महिन्यात या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्याच्या सुमारास या लॉटरीची अंतिम सोडत जाहीर केली जाईल. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे आहेत.
कोकण मंडळाच्या या आगामी सोडतीत प्रामुख्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि घोटेघर या परिसरातील घरांचा समावेश असणार आहे. मुंबईला लागून असलेल्या आणि उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या या भागात घरांना मोठी मागणी असते. या लॉटरीत दोन महत्त्वाच्या श्रेणींमधून घरे उपलब्ध करून दिली जातील. यामध्ये ‘सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने’अंतर्गत खासगी विकासकांकडून म्हाडाला प्राप्त होणाऱ्या २० टक्के कोट्यातील घरे आणि ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत (PMAY) अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी विशेष परवडणाऱ्या घरांचा समावेश असेल.
मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा कायम मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) खासगी विकासकांच्या घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या पारदर्शक आणि परवडणाऱ्या घरांना नागरिकांची पहिली पसंती असते. २०२५ मध्ये कोकण मंडळाच्या सोडतीला दीड लाखांहून अधिक अर्ज आले होते. दरम्यान, मुंबई मंडळाची सोडत ऑक्टोबरमध्ये अपेक्षित होती, मात्र पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने ती लांबणीवर पडली आहे. मुंबईतील घरांची प्रतीक्षा कायम असली तरी, कोकण मंडळाच्या या निर्णयामुळे ठाणे-कल्याण पट्ट्यात घर शोधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या सोडतीसाठी आवश्यक असलेली सॉफ्टवेअर आणि तांत्रिक पडताळणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच जाहिरातीचा मसुदा प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.




