breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

चांदणी चौकातील पूल ५ सेकंदात जमीनदोस्त होणार, २ ऑक्टोबरचा ‘मुहूर्त’

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

चांदणी चौकातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या पुलाला पाडण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून २ ऑक्टोबरच्या पहाटे २ वाजता हा पूल तुकड्यांमध्ये पाडला जाणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. केवळ ५ सेकंदांमध्ये हा पूल पाडण्यात येणार आहे.
या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी संबंधित यंत्रणांची बैठक झाली. त्यात जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नियोजनाबाबत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याबाबत देशमुख म्हणाले, हा पूल पाडण्यापूर्वी येथील सर्व सेवा वाहिन्या स्तलांथरीत करण्यात आल्या आहेत. तसेच पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या वाढीव लेनसाठी सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी संबंधित जमीन मालक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. हा अपवाद वगळता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुचविलेली सर्व जमीन ताब्यात आली आहे. हा पूल पाडण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी शनिवार हा कमी वाहतुकीचा दिवस निवडण्यात आला आहे. तसेच रात्री वाहतूक तुलनेने कमी असल्याने रात्री वेळ योग्य असल्याचे संबंधित यंत्रणांचे म्हणणे होते. त्यानुसार ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या काळात वाहतूक पोलिस तसेच पुणे व पिंपरीचे पोलिस उपस्थित राहतील.

पूल पाडण्यासाठी ही यंत्रणा असणार..
▪सुमारे ६०० किलो स्फोटकांचा वापर
▪पुलाला १३०० ठिकाणी दीड मीटर खोलीची छिद्रे
▪इम्पोलजन किंवा एक्सप्लोजन या पद्धतीने न पाडता त्याचे तुकडे (फ्रॅगमेंटेशन) करून पाडण्यात येणार
▪केवळ ५ ते ६ सेकंदांत पडणार पूल
▪त्यानंतर अर्ध्या तासाने जिवंत स्फोटके नाहीत याची खात्री करून राडारोडा उचलणार
▪४ डोझेल, ८ पोकलेन, ३० टीप्पर अशी अवाढव्य वाहने
▪१०० मजूर हा राडारोडा उचलणार
▪सहा तासांत उचलणार राडारोडा
▪२०० मीटरच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी केवळ ४ जण थांबणार
▪त्यात १ स्फोट करणारा, १ प्रकल्प व्यवस्थापक, १ स्फोट डिझायनर व १ पोलीस
२०० मीटर परिसरातील तीन इमारतींना पूर्णपणे मोकळ्या करणार

पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या धुळीचे लोट उठणार आहेत. तसेच या स्फोटामुळे परिसरातील इमारतींना धोका पोचू शकतो याचा अंदाज घेऊन २०० मीटर परिसरातील तीन इमारतींना पूर्णपणे मोकळे करण्याबाबतची नोटीस देण्यात येणार आहे. या तिन्ही इमारती हॉटेल असून अन्य कोणत्याही रहिवासी इमारती नाहीत. नागरिकांनी या काळात या मार्गाने जाणे टाळावे. केवळ आपत्कालिन परिस्थितीत जात असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा. याबाबत सातारा, कोल्हापूर जिल्हाधिकारी तसेच वाहतूकदारांच्या संघटनेलाही कळविण्यात येणार आहे.

  • डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.

वाहतूक नियोजनात बदल…
वाहतूक नियोजनाबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले, या दिवशी कात्रज चौकापासून हिंजवडी राजीव गांधी पुलापर्यंत सर्व ठिकाणी वाहतूक पोलिस असतील. मुंबईकडून येणारी जडवाहतूक तेळगाव येथील टोल नाक्यावरच थांबविण्यात येणार आहे. तर साताऱ्याकडून येणारी वाहतूक केढ शिवापूर टोल नाक्यावरच थांबवली जाई. मात्र, हलकी वाहने पिंपरी, बाणेर, औंधमार्गे शिवाजीनगर, स्वारगेट कात्रजपासून पुन्हा महामार्गावर वळविण्यात येईल. तर साताऱ्याकडून येणारी हलकी वाहने जुना कात्रज घाट कात्रज चौक, स्वारगेट, टिळक रस्ता, शिवाजीनगरहून औंध किंवा पिंपरीमार्गे मुंबईकडे वळविण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button