व्हिडीओ कॉल करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर गळफास घेऊन मुलाने संपवलं आयुष्य
![The boy ended his life by strangling his mother after wishing her a happy birthday by making a video call](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/beaten-to-death-1538703563-1563041099-1592017534-1599378557-e1631422284497-1.jpg)
सातारा | प्रतिनिधी
सातारा शहरातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कॉलेजमधील तरुणाने आपल्या आईच्या वाढदिवशीच गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शाहपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.
प्रेम पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो साताऱ्यातील एका पेठेत आपल्या आई-वडिलांसह राहतो. प्रेमचे वडील हे पेशाने शिक्षक तर आई गृहिणी आहे. प्रेम साताऱ्यातील एका कॉलेजमध्ये ११ वी त शिकत होता. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणेच (गुरुवारी) प्रेमचे आई-बाबा शेतीच्या कामासाठी गावाला गेले होते, त्यावेळी प्रेम घरात एकटाच होता.
शुक्रवारी झोपेतून उठल्यानंतर प्रेमने आईला व्हिडीओ कॉल करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर लगेचच त्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. शेजारच्या लोकांना याबद्दल माहिती समजताच त्यांनी प्रेमच्या आई-वडिलांना माहिती दिली. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली असून पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रेमच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.