फडणवीसांच्या डावपेचांना सुरुवात, सेनेने नाकारल्यानंतर मोठा ट्विस्ट, संभाजीराजेंना पाठिंबा देणार?
![The beginning of Fadnavis's maneuvers, big twist after Sena's rejection, will support Sambhaji Raje?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/MNS-MLA-for-Rajya-Sabha-Sambhaji-Raje-supports-Chhatrapati-see.jpg)
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांचं मविआ पुरस्कृत म्हणून राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं आहे. शिवेसेनेचे कोल्हापूरचे निष्ठावंत शिवसैनिक संजय पवार यांची अधिकृत उमेदवारी सेनेने जाहीर केली आहे. त्यामुळे सेनेच्या दृष्टीने संभाजीराजे छत्रपती यांचा विषय संपला आहे. सेनेने नाकारल्यानंतर राज्य भाजपचे सर्वेसर्वा तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या डावपेचांना सुरुवात झाली आहे. संभाजीराजे जर अपक्ष भूमिकेवर ठाम असतील तर भाजप त्यांना पाठिंबा देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच छत्रपतींना नाकारल्याचा मुद्दा घेऊन भाजप सेनेच्याविरोधात रान उठवू शकते. दुसरीकडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे यांना पाठिंबा देऊन ‘छत्रपती घराण्याचा सन्मान’ राखल्याचा मेसेज देऊन मराठा मतांना आकृष्ट करण्याची मोठी खेळी भाजप खेळू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय पवार यांच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. तसेच संभाजीराजे आमच्य संपर्कात नाहीत. त्यांच्या उमेदवारीचा विषय आमच्यावतीने पूर्ण संपल्याचं देखील राऊतांनी सांगितलं. दुसरीकडे सेनेने छत्रपतींच्या उमेदवारीचा विषय संपवल्यानंतर भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. जर संभाजीराजे अपक्ष भूमिकेवर ठाम असतील तर संभाजीराजेंना पाठिंबा देऊन भाजप सेनेची कोंडी करु शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिसऱ्या जागेबाबतचे सर्वाधिकार वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांना दिले
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या जागांबाबत बराच खल झाला. सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या एकूण सहा जागांपैकी २ जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येतील. मात्र, तिसऱ्या जागेसाठी भाजपलाही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे ही जागा लढवायची की नाही, याबाबत भाजपने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. याच जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे ही जागा लढवून मराठा समाजाचा रोष पत्कारायचा अथवा संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देऊन छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखायचा, याबाबत अद्याप भाजपचा निर्णय झालेला नाही. कालच्या बैठकीत यावर बरीच चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीअंती भाजप पक्षश्रेष्ठींनी राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबतचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देऊ केले आहेत.
राजेंचं काय होणार, देवेंद्र फडणवीस यांची निर्णायक भूमिका
त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा द्यायचा किंवा नाही, याचा निर्णय आता सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचे समजते. राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपने तिसऱ्या जागेवरही उमेदवार द्यावा, असा एक मतप्रवाह देखील पक्षात आहे. तसे घडल्यास भाजपच्या गोटातून धनंजय महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, भाजपने ही जागा लढवली तरी महाविकास आघाडीच्या तुलनेत उमेदवार निवडून येण्याची शाश्वती कमी आहे. त्याऐवजी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे यांना पाठिंबा देऊन ‘छत्रपती घराण्याचा सन्मान’ करण्याचे पुण्य पदरात पाडून घेण्याची संधी भाजपला आहे. तेव्हा आता देवेंद्र फडणवीस काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.