यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार, मान्सूनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम…
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस ओसरला असून आता कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. अशात यंदाचा मान्सून हा राज्यात उशिरा दाखल होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून यावेळी केरळमध्ये उशिराने दाखल होणार आहे. उशिरा दाखल होत असलेल्या मान्सूनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होणार आहे. भारतीत तब्बल ५२ टक्के शेतजमीन ही शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तर देशातील सुमारे ४० टक्के अन्नधान्य याच कृषी क्षेत्रातून तयार होतं. त्यामुळे याचा परिणाम कुठेतरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
१ जूनला येणार मान्सून यंदा ४ जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जर ४ जून रोजी मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं तर पुढील २ दिवसांत म्हणजेच ६ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे.
दरवेळी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा हाच मान्सून दोन ते तीन दिवस उशिराने दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अशात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतात यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात भारतात एल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.




