‘अंबानी परिवाराला देशातच नाही तर विदेशातही Z+ सुरक्षा द्या’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
![Supreme Court directs Z+ security to Ambani family not only at home but also abroad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/mukesh-ambani-family-780x470.jpg)
सुरक्षा कवच प्रदान करण्याचा संपूर्ण खर्च अंबानींना करावा लागणार
मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत गौतम अदानी यांना नुकतेच मागे टाकत मुकेश अंबानींनी अव्व्ल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे त्यांना देशातील एक महत्वाचे व्यक्ती म्हणुन स्थान मिळाले आहे. याच पारश्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणीदरम्यान महत्वाचा आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण भारतात आणि परदेशात सर्वोच्च स्तरावरील Z+ सुरक्षा कवच प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. भारताच्या हद्दीत किंवा परदेशात सर्वोच्च स्तरावरील Z+ सुरक्षा कवच प्रदान करण्याचा संपूर्ण खर्च त्यांना करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांची तीन मुलं आकाश, अनंत आणि इशा यांना आलेल्या धमकी प्रकरणातील मूळ कागदपत्र आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश नुकतेच त्रिपुरा उच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. या प्रकरणी केंद्राकडून विशेष सुट्टीकालीन याचिकाही करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण निकाली काढत याबाबत अंतिम आदेश दिले आहेत.