सोलापूर तापले। पारा 43 अंशाच्या पार; नागरिकांच्या अंगाची लाहीलाही!
![Solapur got hot. Mercury above 43 degrees; Lahi Lahi of citizens!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/rising-temperature-Anc7lQ.jpeg)
सोलापूर: गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात तापमानात असह्य वाढ होऊन ते रविवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान 43.7 अंशांच्या घरात गेले आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी या हंगामातील 43.1 अंश इतके सर्वाधिक तापमान होते. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे.
वास्तविक, बुधवारी 24 एप्रिल रोजी 41.2, गुरुवारी 41.1 शुक्रवारी 41.2 तर काल शनिवारी, 27 एप्रिल रोजी 42 अंशांच्या घरात गेले होते. रविवारी शहराचे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे 43.7 अंश सेल्सियस इतके वाढले आहे.
आता असह्य़ तापमानामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरणे टाळले आहे. तर दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे. गरिक उन्हात कामे करणे टाळत आहेत. डोक्यावर उन्हाळी टोप्या, खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे, तर महिलावर्ग तोंडावर स्कार्फ घालून फिरताना दिसत आहेत. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी व हमालांना भर उन्हात कामे करावी लागत आहेत.