धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तीन तरुण जागीच ठार
![Shocking! Three youths on a two-wheeler were killed on the spot in an unidentified vehicle collision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/bike-accident.jpg)
नांदेड |
भरधाव जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन चिरडल्याची घटना नांदेड-हैदराबाद महामार्गावरील धनेगाव चौकात घडली. या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. लोहा तालुक्यातील मारतळा येथील विनोद दर्शने (१९), लंकेश वाले (२१) तसेच कंधार तालुक्यातील गऊळ येथील सतीश देवकांबळे (२०) हे तिघेजण मोटारसायकल क्रमांक एम.एच.२६ बी.टी.९८७५ वरुन दुध डेअरीकडून वाजेगावकडे जात होते. १७ जून २०२१ रोजी मध्यरात्री ते शहराशेजारील चौकात आले असता चंदासिंघ कॉर्नरकडून जुन्या पुलाकडे जात असलेल्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या घटनेत तिघेजण जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शोक घोरबांड, पोलीस उप-निरीक्षक गणेश होळकर यांच्यासह महामार्गचे पोलीस उप-निरीक्षक विठ्ठल दुरपडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून मयतांचे मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तिन्ही तरुण मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच टाहो फोडल्याचं पहायला मिळालं.