धक्कादायक: ‘चूप बैठ, खत्म करूंगा’, माजी नगरसेवकाच्या कुटुंबियांच्या गळ्याला चाकू लावून चोरी!
परभणी : जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी चक्क माजी नगरसेवकाच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील सदस्याच्या गळ्याला चाकू लावत सोने-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड लांबविली. ही घटना परभणीच्या पाथरी शहरातील व्हीआयपी कॉलनी येथे घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी २ लाख ३७ हजारांचा ऐवज लांबविला आहे.
‘चूप बैठ, खत्म करूंगा’…
पाथरी शहरातील व्हीआयपी कॉलनीत माजी नगरसेवक शरद झाडे यांचे घर आहे. शरद झाडे हे शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास कुटुंबासह घरात झोपले होते. रविवारी पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांना बेडरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. त्यानंतर शरद झाडे यांना जाग आली. त्यावेळी अज्ञान तीन चोरट्यांनी बेडरुममध्ये प्रवेश करून रुममधील लाईट लावला. यावेळी कोण आहे? असे विचारल्यावर चोरट्यांनी झाडे यांना शस्त्राचा धाक दाखविला. ‘चूप बैठ, खत्म करूंगा’, असे हिंदीतून धमकावले. हा आवाज ऐकून रुममध्ये झोपलेले झाडे यांच्या पत्नी आणि मुले जागे झाले.
७८ हजार रुपयांची नगदी रोकड लंपास…
या सगळ्यांना शस्त्राचा धाक दाखवत झाडे यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने तसेच कपाटातील दागिणे असे साडेसहा तोळे दागिने आणि कपाटातील ७८ हजार रुपयांची नगदी रोकड चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी शरद झाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.