धक्कादायक: जेसीबीने शेती लेव्हलिंगचा वाद विकोपाला गेला, शेजाऱ्याने ‘कित्ती’ने वार केला
![Shocking: JCB's agricultural leveling dispute goes awry, neighbor attacks 'Kitti'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/JCBs-agricultural-l.jpg)
परभणी | जेसीबीने शेती लेव्हलिंग करीत असताना झालेला वाद विकोपाला गेला. शेजारील शेतकऱ्याने कत्ती आणि काठीने मारहाण करून कैलास ज्ञानोबा निळे यांना जखमी केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी निळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
तुमच्या शेतातील लेव्हलिंगमुळे आमच्या शेतात पावसाचे पाणी येईल
सोनपेठ तालुक्यातील मौजे वैतागवाडी शिवारातील कैलास ज्ञानोबा निळे हे त्यांच्या शेतात जेसीबीच्या साह्याने लेव्हलिंग करण्याचे काम करीत होते. यावेळी शेजारील शेतकरी बालासाहेब गिन्यादेव निळे, देवईबाई गिन्यादेव निळे, हनुमान भागवत निळे हे जेसीबीजवळ आले. ‘तुमच्या शेतातील लेव्हलिंगमुळे आमच्या शेतात पावसाचे पाणी येईल’, असे म्हणून वाद घातला. यावेळी बालासाहेब निळे याने कत्तीने कैलास निळे याच्या डाव्या डोळ्यावर वार करून जखमी केले.
काठीने केली मारहाण…
त्यानंतर हनुमान निळे याने काठीने मारहाण केली. तेव्हा जेसीबी चालक, तसेच पंढरी खडके यांनी भांडण सोडविले. याप्रकरणी कैलास निळे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बालासाहेब निळे, हनुमान निळे, देवईबाई निळे (रा. उंडेगाव ता. सोनपेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचा अधिक तपास गंगाखेड पोलिस करत आहेत.