Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन; भारताच्या शिल्पकलेचा एक युगाचा अंत

Ram Sutar | भारतातील नामवंत व जगविख्यात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राम सुतार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी नोएडा येथे जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा भव्य पुतळा राम सुतार यांनी साकारला होता. १८२ मीटर उंचीच्या या पुतळ्यामुळे भारताची शिल्पकला जागतिक पातळीवर अधोरेखित झाली. या पुतळ्याचे काम नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते आणि ते पंतप्रधान असताना या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

शिल्पकलेतील अतुलनीय योगदानाबद्दल राम सुतार यांना १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी २०० हून अधिक भव्य पुतळ्यांची निर्मिती करून भारतीय शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून दिला.

हेही वाचा      :            महापालिका वाढत्या प्रदूषणामागील कारणे शोधणार; खासगी संस्थेची नियुक्ती

१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईतील ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते १९५८ या काळात त्यांनी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे तसेच पंचवार्षिक योजनांवरील लघुशिल्पांचे काम सरकारी सेवेत असताना केले. १९६० नंतर त्यांनी स्वतंत्र स्टुडिओ स्थापन करून पूर्णवेळ शिल्पनिर्मितीला सुरुवात केली.

संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, गोविंदवल्लभ पंत आणि जगजीवनराम यांच्या मूर्तींसह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक थोर व्यक्तींची शिल्पे त्यांनी घडवली. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया आणि इंग्लंडमध्येही त्यांची शिल्पकृती उभ्या आहेत. नेत्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग साकार करणारी भित्तिशिल्पे हेही त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button