माध्यमिक शिक्षण परिषद 2026, इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेत बदल
महाराष्ट्रासारख्या राज्यात पहिलीपासून हिंदी लागू करण्यावरून वाद

मुंबई : उत्तर प्रदेश बोर्ड परीक्षा 2026 मध्ये मोठा बदल होत आहे. आता इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीमध्ये परीक्षेची सुरुवात आता हिंदीपासून नाही तर इतर विषयापासून सुरू होईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यानुसार, पहिल्या दिवशी हिंदीचा पेपर असेल तर विद्यार्थ्यांवर मोठा दबाव येतो आणि त्यामुळे त्याच्या इतर पेपरवर परिणाम होतो असा दावा केला आहे. एकीकडे महाराष्ट्रासारख्या राज्यात पहिलीपासून हिंदी लागू करण्यावरून वाद उफळला होता. त्यात युपी बोर्डाच्या निकालाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नवीन निर्णयानुसार, बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी हिंदीचा पेपर नसेल. तर त्याऐवजी सोप्या विषयाचा पेपर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा तणाव येणार नाही. इतर पेपरवर या तणावाचा कोणताही परिणाम होणार नाही असे बोर्डाला वाटते. बोर्ड अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हिंदी भाषेचा पहिला पेपर असल्यावर विद्यार्थ्यांवर आपोआप मानसिक दबाव येतो. ते एकदम घाबरून जातात. त्याचा परिणाम पुढील पेपरवर सुद्धा होतो. या मानसिक दबावापोटी हिंदी भाषिक मुलं, हिंदीच्याच विषयात नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे, याकडे अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे. तसा हिंदी हा स्कोरिंग विषय, अधिक गुण प्राप्त होण्याचा विषय मानल्या जातो. पण विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आल्याने त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
आता नवीन निर्णय काय?
नवीन निर्णयानुसार, पहिल्या दिवशी हिंदी पेपर नसेल. त्याऐवजी सोपा पेपर असेल. या बदलामुळे विद्यार्थ्यावर मानसिक दबाव येणार नाही. बोर्डाची परीक्षा म्हटल्यावर अगोदरच विद्यार्थी तणावात असतात. त्यांच्यावर अधिक गुण मिळवण्यासाठी मनौवैज्ञानिक दबाव येतो. सोप्या विषयाचा पेपर असेल तर बोर्ड परीक्षेच्या वातावरणाशी विद्यार्थी पहिल्या दिवशी जुळवून घेईल असे अधिकाऱ्यांना वाटते.
वृत्तानुसार, उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीची येत्या तीन-चार महिन्यांनी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा लवकरच तयार करणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. मुलांवर परीक्षेचा कोणताही ताण येणार नाही, यासाठी बोर्ड कसोशिने प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.