चिखलीच्या सौरभ गायकवाडची सर्वोच्च न्यायालयात भरारी
शिक्षण विश्व : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कामगिरी
पिंपरी चिंचवड: ‘परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि कठोर परिश्रम असेल तर आकाशही ठेंगणे ठरते’, याचाच प्रत्यय चिखली येथील आयआयबीएम (IIBM) कॉलेजचा विद्यार्थी सौरभ सुरेश गायकवाड याने आणून दिला आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेत सौरभने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, त्याची भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) येथे ‘ज्युनिअर कोर्ट अटेंडंट’ या अत्यंत मानाच्या पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे दालवडी- फलटण गावाचे नाव संपूर्ण देशात उज्वल झाले आहे.
हॉस्पिटल मॅनेजमेंट ते सर्वोच्च न्यायालय
सौरभ गायकवाड याने आयआयबीएम कॉलेजमधून हॉस्पिटल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने कधीही हार मानली नाही. अभ्यासातील सातत्य आणि मेहनतीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे. एका ग्रामीण पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्याने थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात स्थान मिळवल्याने सर्वच स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा : उपक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षकांची गरज : डॉ. संगीता गोळे
यशात मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा
सौरभच्या या यशात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, माननीय नगरसेविका शितल धनंजय वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभाग प्रमुख अमोल भागवत, अनिकेत वंजारी आणि प्रतीक्षा डफळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कॉलेजने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक वातावरणामुळे आणि प्रोत्साहनामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोठे बळ मिळाल्याचे सौरभने नमूद केले.
“सौरभची निवड ही आमच्या संस्थेसाठी आणि संपूर्ण चिखली परिसरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अत्यंत गरिबीतून शिकून, कोणतीही तक्रार न करता केवळ मेहनतीच्या जोरावर त्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारली आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असते, त्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की ते असाच इतिहास घडवतात. सौरभचा प्रवास हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
— डॉ. धनंजय वर्णेकर (संस्थापक अध्यक्ष, आयआयबीएम कॉलेज)
“आमच्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देश-विदेशात १००% रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. केवळ खासगी क्षेत्रच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीतही यश मिळवावे, यासाठी आम्ही त्यांना सातत्याने मार्गदर्शन करतो. हॉस्पिटॅलिटी हे एक अफाट विस्तारलेले क्षेत्र आहे; जिद्दीच्या जोरावर विद्यार्थी या उद्योगासह सरकारी सेवांमध्येही आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.”
— श्री. अमोल भागवत (विभागप्रमुख, IIBM)





