भाजपासाठी संजय राऊतांनी दिलं आमीर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं उदाहरण…
![Sanjay Raut gave the example of divorce of Aamir and Kiran Rao for BJP ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Sanjay-Raut-Devendra-Fadanvis-Amir-Khan.jpg)
मुंबई |
राजकारणात मार्ग बदलतात, मात्र मैत्री कायम राहते असं सागंत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपासोबतच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. भाजपासोबत मतभेद आहेत, मात्र मैत्री कायम आहे असं स्पष्ट करत असताना संजय राऊत यांनी यावेळी आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं उदाहरण दिलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही असं म्हटलं आहे. मतभेद नक्कीच आहेत आणि मीदेखील हेच सांगत आहे. आम्ही काय भारत पाकिस्तान नाही. भेटीगाठी होत असतात, चर्चा होती असते. पण आता आमचे राजकीय रस्ते बदलले आहेत. फडणवीसांनी हेच सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
“आता आमीर खान आणि किरण राव यांच पहा. रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत… तसंच आहे. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
परिस्थितीनुसार युती होऊ शकते या फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, “त्यांच्याकडे जास्त माहिती असेल. परिस्थिती आता काय आहे आणि भविष्यात काय असेल याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. सध्या महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था आहे, जे सरकार आम्ही बनवलं आहे ते उत्तम चालू आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असून सरकार पाच वर्ष चालणार नाही”. दरम्यान यावेळी त्यांनी पत्र लिहिण्याचे धंदे शिवसेनेने केले नाहीत अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
- फडणवीस काय म्हणाले आहेत…
शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत, शत्रुत्व नाही, असे सूचक विधान करीत राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय होतात आणि जर-तरला कोणताही अर्थ नसतो, असं प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं.
भाजपा नेते आमदार आशीष शेलार आणि शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची शनिवारी बैठक झाल्याचा दावा काही प्रसिद्धीमाध्यमांमधून करण्यात आला. त्याबाबत विचारता फडणवीस म्हणाले, “कोणाची भेट झाली का, ते माहीत नाही. आमच्यात कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. कोणी कोणालाही भेटू शकते. शिवसेनेशी आमचे शत्रुत्व नाही. आमचे काही बांधावरून वाद नाहीत, की त्यांनी आमच्या हद्दीत अतिक्रमण केले. आमच्या मदतीने युतीत असताना निवडून आल्यावर दुसऱ्याचा हात धरून निघून गेले, हा आमचा वाद आहे”.
- मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…
“मोहन भागवत यांनी म्हटलं आहे ते योग्य आहे. आपण सगळे भारतीय आहोत. आपला डीएनए एक आहे. सर्व भारतीय असताना जात, धर्माचा प्रश्न येत नाही. त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
- मोहन भागवत काय म्हणाले आहेत…
“आपण लोकशाही देशात असल्याने हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही असं सांगताना ’सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. त्यामुळे ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. “झुंडबळीच्या गुन्ह्यत सामील असलेले लोक हिंदू नाहीत, ते हिंदुत्वविरोधी आहेत,” असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.