सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठं करण्याची योजना होती!- NIA
![Sachin Waze was planning to do something bigger! - NIA](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/sachin-vaze-1-1-1.jpg)
मुंबई |
सचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आज NIA च्या विशेष न्यायालयाने सचिन वाझेंना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मात्र, आता एक नवी माहिती समोर आली आहे. अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवल्यानंतर देखील सचिन वाझे अजून काहीतरी मोठं करण्याचं नियोजन करत होते, अशी माहिती एएनआयनं एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात नुकतीच एनआयएनं सचिन वाझेंचे सहकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी ओळख असलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली आहे. सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची चौकशी करण्यात आली आहे.
Sachin Waze was planning another big act after explosive planting near Antilia in Mumbai. We are ascertaining if Pradeep Sharma provided logistics support. Param Bir Singh's statement has been recorded as a witness not as a suspect: NIA sources
— ANI (@ANI) April 9, 2021
सचिन वाझेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी
मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझेंची सध्या एनआयएकडून चौकशी सुरू आहे. आजपर्यंत सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत होते. मात्र, आज त्यांची कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यासोबतच विशेष एनआयए न्यायालयाने एनआयएकडे असलेली कागदपत्र हाताळण्याची परवानगी सीबीआयला दिली आहे. सीबीआय सध्या परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करत असून अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.
Mumbai: Court sends suspended Mumbai Police Officer Sachin Waze to judicial custody till 23rd April, he was in NIA custody earlier.
Waze is an accused in Mansukh Hiren death case.
— ANI (@ANI) April 9, 2021
प्रदीप शर्मा यांचाही सहभाग?
मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटकं ठेवल्यानंतर देखील सचिन वाझे अजून काहीतरी मोठं नियोजन करत होते. प्रदीप शर्मा यांनी या सगळ्या प्रकरणात सचिन वाझे यांना मदत तर केली नाही ना, याची सध्या एनआयए चौकशी करत आहे. याशिवाय परमबीर सिंह यांच देखील एनआयएनं स्टेटमेंट नोंदवून घेतलं आहे. मात्र, ते साक्षीदार म्हणून नोंदवून घेतलं असून संशयित म्हणून नाही”, अशी माहिती एएनआयनं दिली आहे.