रोहित पवारांचा सवाल ः महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी भाजपाचे खासदार गृहमंत्र्यांना का भेटले नाहीत?
मुंबई ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी भाजपा किंवा शिंदे गटाचे खासदार गृहमंत्र्यांना का भेटले नाहीत? महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ते गृहमंत्र्यांना भेटायला पाहिजे होते, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला रोहित पवार सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी ‘माय महानगर’सोबत बातचीत केली.
लोक स्वतःचा खर्च करून महामोर्चाला आले आहेत. विविध विचारांचे लोक एकत्र आले आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी लोक आले आहेत. पण महाराष्ट्राचं सरकार झोपलेलं आहे. राजकारण करत आहेत. राज्यपाल महापुरुषांबद्दल बोलतात, भाजपाचे नेते महापुरुषांबद्दल बोलतात. तरी सरकार शांत आहे. खरंतर यांचं रक्त उसळलं पाहिजे. पण ते होत नाही. त्यामुळे राजकीय विरोध व्हावा म्हणून छोटं मोठं आंदोलन करत आहेत. पण ज्यांनी आंदोलनाची हाक दिली तेच आज मुंबईत नाहीत, अशी भाजपाची अवस्था आहे, असा घणाघात रोहित पवारांनी यावेळी केला.
भाजपाचे, शिंदे गटाचे खासदार गृहमंत्र्यांना भेटले नाहीत. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ते भेटले पाहिजे होते. महाराष्ट्राच्या अस्मितेला तुम्ही बुट्टी मारता. मविआच्या खासदारांनी भेट घेऊन दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवण्याची गृहमंत्र्यांना विनंती केली. त्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची बैठक झाली. त्यामुळे अमित शाहांचं मी अभिनंदन करतो. पण, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचलं तर महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला.
दरम्यान, महामोर्चाला आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदींसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून भायखळा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. गर्दीचं नियोजन करण्याकरता मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर, वाहतूक नियंत्रणासाठी काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.